Pune : संगीत आनंदासाठी आहे, मुलांना त्याचा ताण देऊ नका – शंकर महादेवन

एमपीसी न्यूज- “सुरांमध्ये खेळणे, त्याच्या नादात रममाण होणे यामुळे जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. रोजचे ताण कमी होतात आणि तुमची एकाग्रता, कार्यक्षमता आपोआपच वाढते. मात्र हल्लीचे पालक ‘रिअॅलिटी शो’ सारख्या कार्यक्रमांद्वारे मुलांवरचा संगीताचाच ताण वाढवतात. मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका. त्यांना संगीताचा आनंद घेऊ द्या.” असे आवाहन प्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी केले.

पुण्यातील चांदणी चौक, कोथरूड येथील ‘शंकर महादेवन अकादमी’च्या वतीने ‘विद्यारंभ’ या गाणं शिकू इच्छिणाऱ्या मुलांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संगीत शिकू इच्छिणाऱ्या मुलांना संगीताचे धडे दिले. सदर कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. यावेळी शंकर महादेवन अकादमीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर रंगनाथन, अकादमीचे सहसंस्थापक नितीन कोमवार, चित्रपूर मठाचे प. पु. स्वामीजी, अकादमीचे संचालक प्रवीण कडले आदि उपस्थित होते.

संगीताचा विद्यारंभ करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी सात सूर, ताल आणि त्यातील वेग यांचे पायाभूत धडेही विद्यार्थ्यांना दिले. यावेळी अगदी अडीच वर्षांच्या विद्यार्थ्यापासून ते 60 वर्षे वयोगटापर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. जगातील प्रत्येक नाद हा केवळ 7 सुरांमध्ये गुंफलेला आहे. त्याचा आनंद सगळीकडे पसरविण्याच्या हेतूनेच या अकादमीची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “येथे कोणी आवड म्हणून, कोणी ज्ञान मिळविण्यासाठी तर कोणी अगदी खोलात शिरण्यासाठी संगीत शिकत असले. तुमचा हेतू कोणताही असला तरी संगीताचा आनंद घेता येणे हे जास्त महत्वाचे आहे. संगीत ही एक भाषा आहे. त्यातून तुम्ही मुलांना मूल्य शिक्षणही देऊ शकतात किंवा इतिहास-भूगोलही शिकवू शकतात. जगातला कोणताही विषय संगीतातून सहज शिकता व शिकवता येऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने सादरकर्ते होण्याची आवश्यकता नाही.” यावेळी त्यांनी मुलांना ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या चित्रपटातील स्वत: गायलेले प्रसिद्ध भजन ‘सूर निरागस हो…’ हे शिकविले व जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन देत प्रत्येक गाण्यातील सुरांवर कसे लक्ष द्यायचे त्यांना सात सुरांत कसे बसवायचे याचे पायाभूत शिक्षण देखील दिले. त्यानंतर प्रसिध्द चित्रपट गीत ‘कल हो ना हो..’ याचे सूरही त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले.

पुणे हे आपले एक अत्यंत आवडीचे ठिकाण असल्याचे सांगत ते म्हणाले, “पुण्यात मी कधी सवाईमध्ये शास्त्रीय संगीत गायला, कधी फ्युजन गायला तर कधी चित्रपट गीते गायला आलो. पण या प्रत्येकच प्रकारात पुण्याने मला कायमच भरभरून प्रेम दिले. येथील श्रोते फारच चोखंदळ आणि गुणग्राही आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.