Pune : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदावर भाजपचे शंकर पवार; पवार यांनी 37 मतांनी केला जाधव यांचा पराभव

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदावर भाजप-आरपीआय (आठवले गट) तर्फे ज्येष्ठ नगरसेवक शंकर पवार यांना सोमवारी संधी देण्यात आली. तर, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फे भैय्यासाहेब जाधव यांना संधी देण्यात आली. यावेळी 80 – 43 असे मतदान झाले. यात 37 मतांनी पवार यांनी जाधव यांचा पराभव केला.

यावेळी शंकर पवार यांची निवड झाल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आमदार चेतन तुपे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांनी अभिनंदन केले.

शंकर पवार हे राज्यसभेचे खासदार संजय काकडे गटाचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर पुणे महापालिकेतील पदाधिकारी बदलण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे आमदार झाल्यानंतर त्यांनी ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर काम करण्यासाठी शंकर पवार यांना संधी देण्यात आली. त्यांनतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पवार यांचे अभिनंदन केले.

स्थायी समिती सदस्य म्हणून पवार यांनी काम केले आहे. योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव आणि विशाल तांबे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी या निवडीबाबतची माहिती मागितली. पक्षीय बलाबलनुसार निवड करण्यात यावी, अशी मागणी सभागृह नेते धिरज घाटे यांनी केली. त्याला पृथ्वीराज सुतार यांनी हरकत घेतली. तुमचीच निवड होणार, पण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगा, असे सुतार म्हणाले.

दरम्यान, ‘पीएमपीएमएल’चे अधिकारी खास सभेला उपस्थित नसल्याने नगरसेविका नंदा लोणकर, योगेश ससाणे यांनी नाराजी व्यक्त केली.

                                                                                                                        शंकर पवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.