Pune : शरद पवार कलाकारांची कदर करतात, त्यामुळेच राष्ट्रवादीत प्रवेश केला : प्रिया बेर्डे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलाकारांची जाण आहे. ते कलाकारांची कदर करतात. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चित्रपट सृष्टीतील कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात प्रवेश केल्याचेही त्या म्हणाल्या.

प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांनी आज, मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्व कलाकारांचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले.

अभिनेत्री सुवासिनी देशपांडे, गायक राजेश सरकटे, अभिनेता आशु वाडेकर, संग्राम सरदेशमुख, उमेश दामले, विनोदी खेडकर, सिद्धेश्वर झाडबुके, दिग्दर्शक सुधीर निकम यांच्यासह इतर कलाकारांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय व मुलगी स्वानंदी यावेळी उपस्थित होत्या.

आता राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे. यापुढे कलावंतांना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून करणार आहे.

विधान परिषदेवर जायचे म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. कलाकारांच्या समस्या सोडविणे महत्वाचे आहे. पक्ष मला जी जबाबदारी देईल, त्यानुसार काम करणार असल्याचेही बेर्डे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like