Pune : एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करा – शरद पवार

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं असून पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पवार म्हणाले की, लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही असेच वातावरण झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला नव्हता. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा सगळ्यांनी वाचला आहे, त्यात त्यांनी असंतोष मांडला आहे. हा समाजाचा बुद्धिमान वर्ग म्हणून ओळखला जातो. सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या दोन ओळींसाठी तुरुंगात ठेवले हा सत्तेचा गैरवापर आहे. टीका केली म्हणून त्याला राष्ट्रद्रोह म्हणणे योग्य नाही असे पवार म्हणाले.

यावेळी पवार यांनी ढसाळ यांच्या ‘रक्ताने पेटलेल्या अगणित सुर्यांनो’ कवितेचे वाचन केले. सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या जर्मन कवितेचे हिंदीतून वाचनही पवार यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

सध्या गाजत असलेल्या एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) या विषयी बोलताना पवार म्हणाले, ” या प्रस्तावाला आमचा विरोध, मतदानही विरोधात केले. या प्रस्तावामुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे” अशी टीका पवार यांनी केली.

शरद पवार यांनी उपस्थित केलेले महत्वाचे मुद्दे-

# गृहमंत्र्यांनी मांडताना घुसखोर शब्द वापरला. तीनच देशांचा उल्लेख केला. एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
# धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचे काम केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न
# 8 राज्यांनी कायदा स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली. 8 वे राज्य बिहार असून ते एनडीएचे प्रतिनिधी आहे.
# आपल्या देशात केंद्राची जबाबदारी आहे की राज्य आणि केंद्र समन्वयाने चालावे मात्र तशी केंद्राची इच्छा नाही
# लेखक, विचारावंतांसारखे वैचारिक घटक आहेत, त्यांचीही तीव्र प्रतिक्रिया आहे. नेव्हीचे माजी प्रमुख ऍडमिरल रामदास यांचाही विरोध. हा फ़क्त मायनोरिटीचा विरोध नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.