Pune : शिवसेना बावचळलीय ; चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, लोया आणि मुंडे प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचेही पाटील यांनी निक्षून सांगितले. ; Shiv Sena Confused; Chandrakant Patil's attack

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिह रजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि जस्टिस लोहिया यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना बावचळलीय, ते काहीही बडबडत आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला.

जस्टिस लोया प्रकरणाचा विषय कधीच संपला आहे. तो पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता. हे जगाला माहीत आहे.

मुंडेंचा अपघात होता हे सर्वांनी स्वीकारलंय. ते उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, असे पाटील यांनी सांगितले.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, लोया आणि मुंडे प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचेही पाटील यांनी निक्षून सांगितले. आपल्या देशात लोकशाही आहे.

त्यामुळे लोया व मुंडे प्रकरणात कोणाचे काही म्हणणे असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी करावी. साधं पोस्टकार्ड लिहूनही मागणी करता येते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आम्ही कधीच आदित्य ठाकरे यांचं अधिकृतपणे नाव घेतलं नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे आम्ही कशाला बोलायचे.

या प्रकरणावर शिवसेनेला बोलायला वेळ लागला आहे. वेळ लागल्यावर माणूस नीट बोलतो, असे मानले जाते, मात्र, ते बावचळल्यासारखे बोलत आहेत.

शिवसेनेने आधी सोशल मीडियात संभ्रम निर्माण केला. त्यामुळे या प्रकरणाचा संशय अधिकच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काहीही बोलून पुन्हा लोकांच्या मनातील संशय अधिक पक्का करीत असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.