Pune : बांधकाम प्रीमियम शुल्क टप्पेनिहाय भरण्यास शिवसेनेचा विरोध : पृथ्वीराज सुतार

Shiv Sena opposes paying premium fee to builders step by step: Prithviraj sutar : महापालिका आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका स्थायी समितीच्या 23 जून 2020 च्या कार्यपत्रिकेवरील विविध बांधकामांना प्रीमियम शुल्क टप्पेनिहाय भरण्याबाबत परवानगीच्या विषयाला शिवसेनेचा विरोध आहे, असे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. त्यासंबंधीचे पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

ही योजना ठराविक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी आणलेली आहे. सध्याचे मनपा प्रशासन आणि सत्ताधारी हे ठराविक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठीच काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

नवीन बांधकामांचे प्रीमियम शुल्क 3 टप्प्यांत 33, 33 आणि 34 टक्के या प्रमाणे घेण्याचे प्रस्तावित केले. त्यामुळे महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुद्धा त्या प्रमाणात पुढील आर्थिक वर्षात मिळणार आहे. तसे मनपाचे उत्पन्न या आर्थिक वर्षात 67 टक्के कमी होणार आहे.

कोरोनामुळे जीएसटी, पाणीपट्टी, मिळकत कर, विकास शुल्क, यावर पहिल्या तिमाहीत मनपाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. या योजनेमुळे मनपाचे उत्पन्न वाढणार नसून कमी होणार आहे. व्यवसायिकांनी शुल्क न भरल्यास वसूल करणे अडचणीचे ठरणार आहे.

त्यामुळे महापालिकेला कायदेशीर लढा द्यावा लागणार आहे. ही योजना कोणत्या अंतिम काळासाठी राबविणार, याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी आहे, अशी शंका उपस्थित होत आहे.

मनपाला जर बांधकाम व्यवसायाला चालना द्यायची असेल तर संपूर्ण शुल्क एक रक्कमी भरणाऱ्यास ठराविक टक्के रक्कम कमी करण्याची सवलत द्यावी, ही योजना ठराविक काळासाठी राबवावी.

त्यामुळे महापालिकेला निश्चितच मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते, असेही पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.