Pune: राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी माफी मागावी; शिवसेनेचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कायद्याच्या चौकटीचे कारण पुढे घेऊन समस्त महाराष्ट्रीयांच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानी जनतेच्या अस्मितेला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे.

एमपीसी न्यूज – देशातील सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेत नवनियुक्त खासदारांच्या शपथविधीप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी देवी भवानीमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आदरयुक्त शब्द व्यक्त केल्यावरून सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना टोकले. त्यांना व बाकीच्या सदस्यांना अशी घोषणा देण्यास मनाई केली. हे घर नाही, माझे दालन आहे, पुन्हा अशा प्रकारच्या घोषणा इथे चालणार नाही, अशा प्रकारे दमच भरला. त्याचा शिवसेनेतर्फे गुरुवारी निषेध करण्यात आला.

याप्रकरणी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी माफी मागावी, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शहर संघटिका संगीता ठोसर, शहर समनवयक आनंद दवे, अमृत पठारे, करुणा घाडगे, सलमा भाटकर, विद्या लोखंडे, वैशाली पुजारी, वृषाली पवार, किरण साळी, विजय देशमुख, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे, तानाजी लोणकर, अभय वाघमारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानला मुघल साम्राज्याच्या अन्यायातून मुक्तता दिली. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेऊन ती पूर्णत्वाला नेली. रयतेच्या नसानसात भिनवून अन्याय व अत्याचारांच्या विरोधात लढायला शिकविले.

त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कायद्याच्या चौकटीचे कारण पुढे घेऊन समस्त महाराष्ट्रीयांच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानी जनतेच्या अस्मितेला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे. आणि सर्व शिवप्रेमी लोकांचे मन दुखावले गेले आहे, असे शिवसेनेने म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.