Pune : युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही – शरद पवार

विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण

एमपीसी न्यूज- शिवछत्रपती महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात व समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकासाठी केले जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगा युगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते. त्यामुळे या युगपुरूषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.

शिवजयंतीच्या दिवशी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर होते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व आमदार बाबूराव पाचर्णे आणि संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले,“भारतात अनेक राजे होऊन गेले व त्यांना त्यांच्या घराण्यांनी ओळखले जाते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या नावाने ओळखले जाते. ते रयतेचे राजे असून त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन केले. त्यांना दूरदृष्टी, आधुनिकता, भविष्यवेध, कर्तृत्व होते. हा शेतकर्‍यांचा राजा होता”

शिवाजी महाराज हे भारतातले असे पहिले राजे होते ज्यांनी सागरी मार्गाचा उपयोग केला. त्यांनी संकटांना ओळखून सागरी आरमार उभे केले. समाज आणि राज्य यांचा समन्वय साधला. त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले. त्यांच्या सैन्यदलात मुस्लिम सहकारी होते. त्यांचा उपयोग त्यांनी राज्य चालविण्यासाठी केला. धर्माधर्मात त्यांच्या विचारांची संकुचितता सांगितली जात असेल तर ते चालणार नाही.



MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.