Pune : शिवसेना- भाजप-आरपीआय महायुतीला 240 जागा मिळणार – रामदास आठवले यांचा अंदाज

मी, उद्धव आणि फडणवीस तीनच पैलवान रिंगणात

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत 230 ते 240 जागा मिळणार असल्याचा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 2014 पेक्षा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली आहे. शिवसेना – भाजप – आरपीआय सोबत लढत आहे. त्यामुळे वरील आकडा सहज पार करता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुण्यात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेला खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, मंदार जोशी यावेळी उपस्थित होते. राज्यात शक्तिशाली पैलवान कोण ? अशी विचारणा केली असता रामदास आठवले म्हणाले, “मी, उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस तीनच पैलवान अहोत. शरद पवार यांचे वय झाल्यामुळे त्यांना कुस्ती खेळता येत नाही. मी पवारांच्याच तालमीतून आलोय, ही लढाई आम्हीच जिंकणार आहे. त्यामुळे कुस्ती खेळण्याची गरज पडणार नाही”

‘ईव्हीएम’ च्या जोरावर या जागा मिळविणार का? या प्रश्नावर “ईव्हीएम नव्हे तर माणसाच्या मनाची साथ आहे. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या विजय झाला, तेव्हा ईव्हीएमवर शंका का उपस्थित केली नाही. बॅलेट पेपरवर जरी निवडणूक झाली तरी आमची लढण्याची तयारी आहे ” असे आठवले म्हणाले. त्यावर खासदार बापट यांना हसू आवरता आले नाही.

“विधानसभा निवडणुकीत आम्ही पाच जागा कमळावर जरी लढवीत असलो तरी, स्वतंत्र गट नंतर स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असेही आठवले यांनी सांगितले. वंचित आघाडी ही किंचित आघाडी असून तिचा काहीही परिणाम निवडणुकीत जाणवणार नाही. रिपब्लिकन जगविण्याचे काम मी केले. लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यात विरोधीपक्ष नेता राहणार नसल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरे सभेतून मन जिंकतात. बाळासाहेब यांची चांगली नक्कल करतात. पण, विरोधीपक्ष नेतेपद या पक्षालाही मिळणार नाही” असे रामदास आठवले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.