Pune : कोथरूडमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळाली शिवसेनेची साथ; हडपसर, वडगावशेरीत भाजपला फटका

एमपीसी न्यूज – कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची चांगली साथ मिळाली. प्रचाराचा नारळ फुटल्यापासून शिवसेना नेते एकत्रितपणे पाटील यांचा प्रचार करताना दिसून आले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे, पुणे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक योगेश मोकाटे अगदी खांद्याला खांदा लावून कोथरूड मतदारसंघात भाजपचा प्रचार करीत होते.

वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर मतदारसंघांत शिवसैनिक प्रचंड दुखवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळेच कमी मतदानाने भाजप उमेदवारांचा पराभव झाल्याची कुजबुज सुरू आहे. कसबा मतदारसंघात तर शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे यांनी निवडणूक लढविली. सुमारे 14 हजार मते त्यांनी घेतली. महापौर मुक्ता टिळक यांना केवळ 28 हजार मतांनीच विजय मिळविता आला. धनवडे यांची समजूत घातली असती तर, टिळक यांचा 50 हजार मतांनी विजय झाला असता.

खडकवासला मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे प्रबळ इच्छुक होते. 1 तरी मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा, अशी आग्रही मागणी होती. त्यासाठी उद्धव ठाकरे यांची पुण्यातील शिवसैनिकांनी भेटही घेतली. पण, काहीही उपयोग झाला नाही. खडकवासला मतदारसंघात भाजपचे उमेदवार भिमराव तापकीर यांचा केवळ 2500 मतांनी विजय झाला.

शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत केवळ 5 – 5 हजार मतांनी भाजपचे उमेदवार विजयी झाले. पर्वती मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ यांचे मताधिक्य कमी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.