Pune: जिल्ह्यात शिवसेना उरली एका खासदारापुरती!; जिल्ह्यात एकही आमदार नाही, जिल्ह्यातील श्रीरंग बारणे एकमेव खासदार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे विधानसभेचे पाचही उमेदवार पराभूत झाले असल्याने आता जिल्ह्यात शिवसेनेचा एकही लोकनियुक्त आमदार असणार नाही. पुणे जिल्ह्यात शिवसेना केवळ एका खासदारापुरती उरली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे एकमेव जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी होत चालली असल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शिरुरमधून शिवाजीराव आढळराव सलग तीनवेळा निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव यांना पराभवाची धूळ चारली. मावळ लोकसभा मतदारसंघ सलग तीनवेळा शिवसेनेकडे असून श्रीरंग बारणे सलग दुस-यावेळी निवडून आले आहेत. परंतु, त्यांच्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तीनच विधानसभा मतदारसंघ येत आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ येत आहेत.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये पुणे शहरातील आठपैकी एकही मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या एका नगरसेवकाने कसब्यातून बंडखोरी केली. पण, त्यांचा पराभव झाला.

पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हा, पुरंदर, खेड-आळंदी, जुन्नर असे चार आणि पिंपरी असे पाच मतदारसंघ शिवसेनाला सुटले होते. मात्र, चार मतदारसंघात विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. तसेच भोरमधील उमेदवाराला देखील पराभवाला सामोरे जावे लागले.

पुरंदरमधून शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पराभव सहन करावा लागला. खेळ-आळंदीचे विद्यमान आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे आणि पिंपरीचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांनाही पराभव सहन करावा लागला आहे.

तर, भोर-वेल्हा मतदारसंघातून कुलदीप कोंडे यांचा देखील पराभव झाला आहे. पाचही उमेदवारांचा पराभव झाल्याने शिवसेनेचा आता जिल्ह्यात एकही लोकनियुक्त आमदार असणार नाही. पुणे जिल्ह्यातून केवळ श्रीरंग बारणे एकमेव खासदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.