Pune : धक्कादायक ! ससूनमध्ये आज तब्बल 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; 121 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाने हाहाकार माजविला असून बुधवारी तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला. तर, 121 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. या रुग्णालयात आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याणीनगरमधील 69 वर्षीय, पुणे कॅम्पमधील 60 वर्षीय, खराडीतील 37 वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच मंगळवार पेठेतील 50 वर्षीय महिला, आणि 74 वर्षीय पुरुष, पुणे कॅम्पमधील 61 वर्षीय पुरुष, पर्वतीमधील 50 वर्षीय महिला आणि 57 वर्षीय पुरुषाचा, तसेच तडीवाला रोड भागातील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

या सर्व रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्चरक्तदाब, किडनी विकार, मधूमेह, लठ्ठपणा, झटके येण्याचा व हृदयाचा आजार, असे अनेक आजार होते. असे गंभीर आजार असलेल्यांमध्ये 7 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

एकट्या ससून रुग्णालयातच कोरोनाचे शंभरपेक्षा जास्त म्हणजेच 119 बळी गेले आहेत. रोज 2 ते 3 रुग्णांचा या रुग्णालयात बळी जात आहे. त्यामुळे हे रुग्णालय म्हटले की कोरोनाच्या रुग्णांना घामच फुटत आहे.

सातत्याने मृत्यू होत असल्याने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली. त्यानंतरही मृत्यू काही थांबताना दिसून येत नाही. ससूनमध्ये गंभीर स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते.

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांना किडनी विकार, निमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक आजार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 60 ते 80 वयोगटातील जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.