Pune : धक्कादायक ! कोरोनाबाधित मृतदेह तब्बल दहा तास घरातच पडून

मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही : Shocking! Corona-infected bodies lay in the house for ten hours

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 73 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिकाच उपलब्ध झाली नसल्याचा धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलिसांना नातेवाईकांनी याची कल्पना देऊनही तब्बल 10 तासांहून अधिक वेळ मृतदेह घरातच पडून होता. या घटनेने  आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत.

धायरीतील 73 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा कोरोनाचा अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्‍टरने या रूग्णास दुसऱ्या दिवशी तपासणी केल्यानंतर रूग्णालयात दाखल होण्यास सांगितले.

त्यानुसार डॉक्‍टर बुधवारी दुपारी येणार असल्याने या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर सदस्य सकाळी करोना चाचणी करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी या जेष्ठ नागरिकाची पत्नी घरी होती. त्यांचे फॅमिली डॉक्‍टर दुपारी एकच्या सुमारास घरी तपासणीसाठी आल्यानंतर त्यांनी संबंधित कोरोनाबाधित 73 वर्षीय व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले.

त्यानंतर चाचणीसाठी नमुने देऊन घरी आलेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना हा प्रकार समजताच त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाशी संपर्क साधला, त्यानंतर पालिकेचे कर्मचारी या व्यक्तीच्या घरी येऊन गेले.

रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यावर मृतदेह घेऊन जातो, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले, मात्र, नंतर कोणीच आले नाही. याबाबत नातेवाईकांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी स्थानिक पोलिसांशीही संपर्क साधला.

पोलिसांनीही आरोग्य यंत्रणेशी संर्पक साधला, पण, रात्री 9 वाजता त्यांना रुग्णवाहिका येण्यासाठी आणखी 3 ते 4 तास लागणार असल्याचे सांगत नातेवाईकांची बोळवण केली.

त्यामुळे तब्बल दहा तास मृतदेह घरातच पडून राहिला. दरम्यान, या घटनेने मृताच्या कुटुंबियांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.