Pune: स्वयंस्पष्ट आदेश मिळेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंदच राहतील- फत्तेचंद रांका

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या तिघांनी काढलेल्या स्वतंत्र आदेशांमध्ये विसंगती असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसा आदेश निघेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.

पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल (सोमवारी) रात्री पुण्यात झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी एक ऑडिओ क्लिपद्वारे दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. पुणे व्यापारी महासंघाचा आदेश येईपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने बंद राहतील, असे रांका यांनी सांगितले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही व्यापाऱ्याने स्वतःचा, आपल्या परिवाराचा तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रांका यांनी केले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता तसेच रेड झोनमधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी या तिघांनी तीन स्वतंत्र आदेश काढले असून तिन्ही आदेशांमध्ये विसंगती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्याला आम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण पालकमंत्री अजित पवार यांच्याशीही बोललो आहोत. आज (मंगळवारी) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याबाबत विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. किरकोळ व्यापाऱ्यांना पोलीस व महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून होत असलेला त्रास सहन केला जाणार नाही, असा इशाराही रांका यांनी दिला आहे.

दारुविक्री त्वरित बंद करण्याची पुणे व्यापारी महासंघाची मागणी

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणूस बाहेर पडला तर त्याला पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद देण्यात येतो, तेच दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन शासनाने जणू कोरोनाला आमंत्रणच दिेले आहे, अशी टीका रांका यांनी केली. दारुच्या दुकानांसमोर होणारी गर्दी, लागणाऱ्या लांबच लांब रांगा हे कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे दारुविक्रीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.