Pune : जवळपास 3 महिन्यानंतर प्रमुख रस्त्यांवरील दुकाने उघडली ; पुणेकरांचा अल्प प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे शहरातील सर्वच दुकाने जवळपास 3 महिने बंद होती. लक्ष्मी रस्त्यासह बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, अप्पा बळवंत चौक परिसर, कुमठेकर रस्ता, एमजी रस्ता, कोंढवा रस्ता, एनआयबीएम रस्ता परिसरातील दुकाने उघडण्यात आली आहेत. मात्र, खरेदीसाठी पुणेकरांचा पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

या भागातील दुकाने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी रात्री उशिरा दिले. त्यामध्ये काही प्रमाणात गोंधळ असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या सोने-चांदीची दुकाने, मौल्यवान धातू विक्रीबरोबरच कपडय़ांचीही दुकाने सुरु झाली आहेत. हळूहळू शहर आता पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.

दरम्यान, आवश्यकता नसेल तर नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पुण्यात कमालीची शांतता होती. राज्यातील आणि परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात गावी गेले आहेत. त्याचा फटका दुकानदारांना बसला आहे.

कपड्याच्या दुकानांत आता ट्रायल होणार नसल्याचे सांगण्यात आले. माप बघून कपडे खरेदी करावे लागणार आहेत. आणखी काही दिवसांनी व्यवहार पूर्ववत होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तर, कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने 12 तास सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सलून, स्पा ही दुकाने सध्या बंदच राहणार आहेत. पथारी व्यवसायिकांनाही आपला माल विकता येणार आहे. शहरातील अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.