Pune: शहराच्या मध्यवस्तीत भाजीपाल्याचा तुटवडा

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केटयार्ड, गुलटेकडी, खडकी, मोशी येथील भाजीपाला, फळे बाजार तीन दिवसांपासून बंद असल्याने शहरात आज (रविवारी) भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागला.

काही किरकोळ विक्रेत्यांनी आसपासच्या खेडेगावांमधून भाजीपाला आणला. पण, तो शहरासाठी अत्यंत अपुरा ठरला. मध्यवस्तीतील भाग सील केलेला आहे. त्या भागात तर भाजीपाल्याचा तुटवडा खूप जाणवला. भाजीपाल्याची अनेक दुकाने बंद होती. जी चालू होती तिथे नागरिक रांगेत थांबून भाजी घेत होते. पोलिसांची गस्त चालू होती त्यामुळे दुकानांसमोर गोंधळ, गर्दी नव्हती.

अनेक दुकानांमध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो या व्यतिरिक्त भाज्याच शिल्लक नव्हत्या. सगळ्या प्रकारची फळेही उपलब्ध नव्हती. भाज्यांच्या तुटवड्यामुळे काही दुकानांमध्ये चढ्या भावात भाज्या विकल्या जात होत्या. ठोक भाजीमार्केट आणखी चार दिवस बंद रहाणार आहे. परिणामी तुटवडा आणखी जाणवण्याची भीती आहे.

भाजीच्या तुटवड्यामुळे कडधान्याला मागणी वाढली आहे. पण, अनेक दुकानांमध्ये कडधान्याचाही तुटवडा आहे. जिथे ते उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये त्याची विक्री दहा ते पंधरा टक्के चढ्या भावाने होत आहे. अशी तक्रार ग्राहकांनी केली. अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी अशा दुकानांची तपासणी करत नाहीत का, असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.