Pune : नव्या पिढीवर विश्वास, जबाबदारी टाकावी – श्रीकृष्ण चितळे

शेंडे, कुलकर्णी यांना 'युवा पुरस्कार' प्रदान

एमपीसी न्यूज – “उद्योग उभारताना आणि वाढविताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी असायला हवी. नव्या पिढीवर विश्वास टाकून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, तर तेही जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. एखाद्या मुलाच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला, तर पालकांनी त्याला पाठबळ द्यायला हवे,” असे मत उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’युवा उद्योजक पुरस्कार’ महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश आणि केदार कुलकर्णी यांना, तर सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ’सृजन युवा पुरस्कार’ गायिका बेला शेंडे यांना श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी राजन कुलकर्णी व शौनक पानसे यांना युवा उत्कर्ष पुरस्काराने, तर नारायण पेठेतील आपली राहती वास्तू देणगीस्वरुपात देणाऱ्या डॉ. अनिल गांधी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, डॉ. संजय जोशी, ‘युवा’चे श्रीकांत जोशी, सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, मंजुषा वैद्य, तृप्ती नानल, मिलींद दार्वेकर आदी उपस्थित होते.

श्रीकृष्ण चितळे म्हणाले, “व्यवसायात नवीन गोष्टी आत्मसात करताना ग्राहकांच्या मागणीचाही आदर केला पाहिजे. दुग्ध पदार्थांबरोबर बाकरवडी सुरु केली. त्यानंतर बाकरवडी तयार करण्यासाठी मशीन घेण्याचा विचार केला. तेव्हा वडिलांनी आणि काकांनी पाठिंबा दिला. आज मशीनवर बाकरवडी केली जाते. दिवसाला सहा टन बाकरवडी बनते. सहनशीलतेचा वसाही आम्ही व्यवसाय पुढे नेताना जपला आहे.”

बेला शेंडे म्हणाल्या, “गायनाचा वारसा असला तरी मेहनत आणि रियाज महत्वाचा आहे. करिअरमध्ये चढ-उतार आले तरी तुम्ही सामोरे कसे जाता यावर यश अवलंबून असते. प्रत्येक गाणे नवे आव्हान असते. त्यासाठी सतत सराव करते.” विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कुर्डुकर यांनी आभार मानले..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.