Pune : सलग 25 तास गायन करून देशाला मानवंदना

'सूर्यदत्ता काव्यथॉन 2019'मध्ये विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – सलग 25 तास देशभक्तीपर गीते, कवितांचे गायन करून ७३व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने देशाला मानवंदना देण्यात आली.

‘सूर्यदत्ता काव्यथॉन 2019’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता झाली. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सलग 25 तास देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण झाले. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये माजी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मनीष विष्णोई यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ऐ मेरे वतन के लोगो, सारे जहाँ से अच्छा, बलसागर भारत होवो, संदेसे आते है, माँ तुझे सलाम, वंदे मातरम अशा देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला होता. प्रत्येकाला गायनासाठी तीन मिनिटांचा वेळ होता. जवळपास ५०० गाणी यामध्ये गायली गेली. सलग २५ तास गायनाबरोबरच संस्थेशी संलग्नित प्रत्येक विद्यालयाने विविध कार्यक्रम आयोजिले होते. या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह लिमका बुक आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॊर्ड्समध्येही होणार आहे.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “फँशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘विविधतेतून एकता’ संकल्पनेवर फँशन शो झाला. भारतातील विविध राज्यांची प्रादेशिक वेशभूषा, ‘स्वदेशी’ संकल्पनेत खादीपासून बनवलेले, भरतकाम केलेले कपडे, तसेच आधुनिक कपड्यांच्या साहाय्याने रेखाटलेला तिरंगा ध्वजाचे  यांचे सादरीकरण झाले. ‘वॉक द हीरो’मधून स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावशाली व्यक्तींचे दर्शन घडले. राखी बनवणे, मेहंदी/रांगोळी काढणे, ज्वेलरी बनविणे, पोस्टर बनवणे अशा विविध उपक्रमांची जोड याला मिळाली. हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण पाककलेचे दर्शन घडवले. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे स्टॉल लावले होते. त्यातून त्या त्या राज्याची संस्कृती, तेथील पर्यटन स्थळे, खाद्यपदार्थ आणि त्या राज्याची वैशिष्ट्ये प्रदर्शनातून मांडण्यात आली होती. इव्हेंट मॅनेजमेंटया विद्यार्थ्यांनी या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनातं पुढाकार घेतला होता.”

भानुप्रताप बर्गे म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा हा अनोखा उपक्रम आहे. ‘काव्यथॉन’मधून क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले. शहीद हा कधीच मरत नसतो. आपण त्यांना विसरलो तरच ते मरतात. विद्यार्थ्यांना एकात्मतेचे महत्व समजण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. सलग २५ तास गाण्यांतून, कवितांमधून देशप्रेमाचे जागरण करण्याच्या या ऐतिहासिक क्षणी मला उपस्थित राहता आले, यासाठी मी भाग्यवान आहे.”

डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, “स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना शुभेच्छा. नेहमी काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या सूर्यदत्ता संस्थेने राष्ट्राला दिलेली ही अतिशय अनोखी मानवंदना आहे. अशा कार्यक्रमामुळे मुलांना आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण होते. अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, याची नोंद अनेक बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये व्हावी, असे वाटते.”

मनीष विष्णोई म्हणाले, “सलग 25 तास देशभक्तीपर गायन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अशा आगळ्या उपक्रमाची नोंद करण्यासाठी आम्ही या उपक्रमाचे निरीक्षण करत आहोत. सूर्यदत्ता संस्थेने अतिशय नियोजनबद्ध आणि सुरेख पद्धतीने हा कार्यक्रम राबविला असून, याची नोंद विक्रमात होणार असे दिसते.”

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like