Pune : एसएनबीपी, सेंट ऍन्स कुमार गटात विजेते; हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी

एमपीसी न्यूज – यजमान एसएनबीपी, पिंपरी आणि सेंट ऍन्स प्रशाला यांनी 14 वर्षांखालील गटात हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेचे अनुक्रमे मुले आणि मुलांच्या विभागातील विजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात एसएनबीपी संघाने ध्रुव शर्माच्या दोन गोलच्या जोरावर दिल्ली पब्लिक स्कूलचा 4-0 असा पराभव केला.

ध्रुवने पाचव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर दहाच मिनिटांनी त्याने आपला व संघाचा दुसरा गोल केला. मध्यंतराला त्यांनी 2-0 अशी आघाडी राखली होती. उत्तरार्धात प्रणय गावडे याने 22व्या, तर शिवेंद्र जाधव याने 28व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी भक्कम केली. त्यानंतर बचाव पक्का ठेवत त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

  • तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूलने सेंट पॅट्रिक्‍सचा 1-0 असा गोल केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सेंट ऍन्स प्रशाला संघाने अँग्लो उर्दू प्रशाला संघाचा 3-1 असा पराभव केला. सानिया सय्यद हिने 7व्याच मिनिटाला गोल करून अँग्लो उर्दुला आघाडीवर नेले होते. मात्र, हे सातत्य त्यांना नंतर राखता आले नाही.

सेंट ऍन्ससाठी प्रथमी शेट्टी हिने 11 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर 20व्या मिनिटाला जान्हवी परमार हिने कॉर्नर यशस्वी करत संघाला आघाडीवर नेले. लगोलग पुढच्याच मिनिटाला तिया जॉर्ज हिने गोल करून प्रतिस्पर्धी खेळाडूंवरूल दडपण वाढवले. यानंतर अँग्लो उर्दु प्रशाला संघाच्या खेळाडूंना आपला खेळ दाखवताच आला नाही. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात एसएनबीपी संघाने सेंट पेट्रिक्‍स संघाचा 3-0 असा पराभव केला.

  • निकाल :
    14 वर्षांखालील मुले : एसएनबीपी पिंपरी 4 (ध्रुव शर्मा 5, 15, प्रणय गावडे 22, शिवेंद्र जाधव 28वे मिनिट) वि.वि. दिल्ली पब्लिक स्कूल 0
    तिसरा क्रमांक : दिल्ली पब्लिक स्कूल 1 (धर्मेश गुप्ता 7वने मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्‍स 0.
    मुली : सेंट ऍन्स प्रशाला 3 (प्रथमी शेट्टी 11, जान्हवी परमार 20, तिया जॉर्ज 21वे मिनिट) वि.वि. अँग्लो उर्दु प्रशाला 1 (सानिया सय्यद 7वे मिनिट)
    तिसरा क्रमांक : एसएनबीपी, पिंपरी 2 (प्रार्थना वाघमारे 10, 20वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्‍स 0.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.