सोमवार, फेब्रुवारी 6, 2023

Pune: ससून रुग्णालयात आतापर्यंत 132 रुग्णांची कोरोनावर मात तर 133 रुग्ण कोरोनाचे बळी! आज 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबाधित मृतांचा आकडा रोज वाढतच आहे. ससून रुग्णालयात आज गुलटेकडी येथील एका 21 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 133 वर पोहचला आहे. आतापर्यंत या रुग्णायलातून कोरोनाचे 132 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 267 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. त्यापैकी 133 जणांचा एकट्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातून आतापर्यंत 132 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुलटेकडीतील 21 वर्षीय तरुणाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणे जिल्हयात आतापर्यंत एकूण 5 हजार 616 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  कोरोनाबाधित एकूण 267  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णांची संख्या 2  हजार 444 आहे. त्यापैकी 204 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

जिल्ह्यात 249 नवे रुग्ण

आज पुणे जिल्ह्यात तब्बल 249 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पोलीस, डॉकटर, महापालिका कर्मचारी, लहान मुले, जेष्ठ नागरिक, पुरुष – महिला या सर्वांनाच कोरोनाने त्रस्त करून सोडले आहे. कोरोनाचा चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेच आहेत. तर, पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत कोरोना वाढताच आहे. राज्य शासनातर्फे तब्बल 7 उच्च दर्जाचे अधिकारी देण्यात आले आहेत. या भागात कडक बंधने लादण्यात आली आहेत, तरीही कोरोना काही कमी होत नाही. उलट वाढताच आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रोगातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Latest news
Related news