Pune : …तर मला पुन्हा पुनर्जन्म नटाचाच हवा -जयंत सावरकर

एमपीसी न्यूज – नट हा अभिनयातून कळला पाहिजे. वागणुकीतून नाही, असे सांगून विधात्याला जर माझ्या हातून अलौकिक असे काही घडावे असे वाटत असेल तर मला पुन्हा नटाचाच जन्म हवा, अशी भावना नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नटश्रेष्ठ जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण यांची 35 वी पुण्यतिथी, नाट्यगृहाचा 20 वा वर्धपन दिन आणि जागतिक रंगकर्मी दिवसानिमित्त संवाद पुणेतर्फे आज (दि. 25) नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष, नटश्रेष्ठ जयंत सावरकर आणि निर्मला सावरकर यांना यशवंत-वणू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एनवायसीएसचे चेअरमन राजेश पांडे आणि सुर्यदत्ता ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, समीर हंपी, नाट्यगृहाचे व्यस्थापक सुनील मते उपस्थित होते.

जयंत सावरकर म्हणाले, वय वाढले तरी उत्साह मात्र कायम असतो ही नियतीची कृपा आहे. कित्येक वर्ष रंगभूमीवर वावरत आहे, रंगदेवतेची पूजा करीत आलो आहे, रंगदेवता प्रसन्नही झाली, पण नाट्यगृहाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी असा विचार कधी मनात आलाच नाही.

चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देताना ‘वाजे पाऊल आपले’ या नाटकाला चव्हाण यांनी रसिक म्हणून लावलेली हजेरी याची आठवण त्यांनी सांगितली.रक्ताच्या नात्यापलीकडील ऋणानुबंध जपले असल्याच्या भावना सुहासिनी देशपांडे यांनी व्यक्त केली.

सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागिल भूमिका विषद केली. सत्यजित धांडेकर, समीर हंपी, दीपक पवार, प्रवीण बर्वे, दीपक गुप्ते यांनी स्वागत केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे गायकवाड यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी सप्तरंग हा गीत-नृत्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात गफार मोमीन, मकरंद पाटणकर, संदीप आगवेकर, गौरी कडूसकर, क्रिशा चिटणीस, शीतल म्हसकर, आरती कवठेकर यांनी गीते सादर केली तर विश्वास पटवर्धन यांनी स्वभाव राशींचे हा कार्यक्रम सादर केला. डॉ. कांचन मुसमाडे, इशिता भागवत यांनी नृत्य सादर केले. मनिष आपटे यांनी निवेदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.