Pune : महाराष्ट्रात गुरुवारी खंडग्रास तर दक्षिण भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण

एमपीसी न्यूज – या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण उद्या (गुरुवारी) होणार असून पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून ते दिसणार आहे. विशेष म्हणजे भारतामधील अनेक शहरांमधून हे ग्रहण पाहता येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह महाराष्ट्रात हे ग्रहण खंडग्रास दिसणार असून दक्षिण भारतात हे ग्रहण कंकणाकृती दिसणार आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहणाचे म्हणजेच ‘रिंग ऑफ फायर’चे आकर्षक व नयनरम्य दृश्य पाहण्याची संधी या ग्रहणाच्या निमित्ताने मिळणार आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसणार असून ते कंकणाकृती असेल. चंद्र मध्ये आल्याने सूर्याचा मधला भाग झाकला जातो. त्यामुळे त्याची कडा प्रकाशमान दिसते, त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती अनुभवायला मिळते.

भारतात सकाळी 7.59 वाजता ग्रहणाला सुरुवात होणार आहे. यात कंकणाकृती अवस्था सकाळी 9.04 वाजता दिसणार आहे. जास्तीत जास्त भाग झाकला जाण्याची अवस्था सकाळी 10.47 वाजता राहील. पूर्ण ग्रहण स्थिती सुटण्यास दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होईल आणि दुपारी 1.35 वाजता सूर्य ग्रहणावस्थेतून बाहेर पडेल.

दक्षिण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोईमतूरमध्ये प्रथम कंकणाकृती स्थितीत ग्रहण दिसेल. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून 60 ते 84 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. मुंबईत 79 टक्के तर पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये 78 टक्के खंडग्रास सूर्यग्रहणाची स्थिती पहायला मिळणार आहे.

सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहावे. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद घेऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.