Pune : सोनिया, राहुल गांधी यांना सावरकर यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही – विक्रम गोखले

एमपीसी न्यूज – राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीही वाचलेले नाही किंवा त्यांना समजून घेण्याची त्यांची इच्छाही नाही. त्यामुळे त्यांना सावरकर यांच्याविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे 18 वर्षे असून अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ देत सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या परंपरेनुसार विक्रम गोखले यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोखले यांनी सध्या सुरू असलेल्या विविध वादांवर त्यांची मते मांडली.

विक्रम गोखले म्हणाले, “मी सावकार भक्त आहे, मी अभ्यास केला आहे. केवळ सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध केला जात आहे. ज्यांना सावरकर कधीच कळले नाहीत आणि ज्यांना समाजात किंमत नाही ते ब्राह्मण तिरस्कारातून वाद निर्माण करत आहेत. स्वत:चे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी वाद पेटते ठेवत आहेत”

सोनिया गांधी यांना सावरकर माहीत नाहीत. त्यांना त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, राहुल गांधी यांना पण अधिकार नाही, सावरकरांविषयी काहीही माहिती नसणारे काहीजण त्यांना शिव्या देतात, हे संतापजनक आहे, असे ते म्हणाले. सावरकर, महात्मा गांधी हे देव नाही तर माणूस होते, गांधी, सावरकर यांची चूक होऊ शकते, हे आपण मान्य केले पाहिजे. सावरकरांनी माफी तुरुंगातून सुटून देशकार्य पुढे चालू ठेवता यावे, यासाठी माफी मागितली होती, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज व मोदींची तुलना चुकीची’

छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. राजे हे राजे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराजांशी तुलना करणे भयंकर आणि चुकीचे आहे. मोदी यांनी त्यांच्या भक्तांना लगाम घातला पाहिजे, असे मत गोखले यांनी व्यक्त केले. मी मोदीभक्त नाही, मी राजकीय पक्षाशी सबंधित नाही, कोणाचा झेंडा मी घेतला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पवार स्वतःला ‘जाणता राजा’ म्हणवून घेणारे नाहीत’

राष्ट्रवादीत फक्त शरद पवार यांच्याकडे व्हिजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दूरदृष्टी असणारे शरद पवार एकमेव नेते आहेत. जाणता राजा कोणी नसतो, तो हळू हळू शिकतो, राजा एकटा चांगला असून योग्य नाही तर खालील प्रशासन बुद्धिमान असणे गरजेचे आहे. पवार हे स्वतःला ‘जाणता राजा’ म्हणवून घेणारे नाही, असे मत गोखले यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना व्यक्त केले.

देशात जात व धर्म उपजत असून हे वाईट आणि घाण आहे. मी स्वतःला हिंदू ब्राह्मण म्हणून घेत नाही. जो ब्रह्म जपतो तो ब्राम्हण होय. पण राजकारणासाठी समाजात धर्म, जात पेरून स्वार्थ साधला जात आहे. त्याची छाटणी होत नाही. लोकांना शहाणे करुन सोडणे हे महत्त्वाचे आहे. सामान्य माणसाला शहाणे करून सोडले पाहिजे, असे गोखले म्हणाले.

ब्राह्मण आरक्षण नको

ब्राह्मणांना आरक्षण नको आहे. आम्ही आमचे आमच्या असलेल्या किंवा नसलेल्या बुद्धीवर जगू किंवा भीक मागून जगू, अशी भूमिका गोखले यांनी मांडली. बंगालमध्ये काही ब्राह्मण संडास साफ करतात, विष्ठा गाडी चालवतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. योगेश सोमण प्रकरण माहीत नाही तसेच राज्याच्या राजकारणात आपल्याला रस नाही, असे उत्तर गोखले यांनी संबंधित प्रश्नांवर दिले.

सरकारमान्य सेन्सॉरशिप योग्य आहे, मात्र खासगी सेन्सॉरशिप नकोच, आम्हाला सिनेमा दाखव आणि त्यानंतर तुम्ही तो दाखवा, हा गाढवपणा आहे, या शब्दांत गोखले यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.सेन्सॉरशिप नसल्याने वेब सिरीज गैरफायदा घेत असून त्याचं दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्व कलाकार एकत्र येतात हे स्वप्नवत वाटते, त्यांनी धाडस लागते हे महत्त्वाचं मात्र तसे होत नाही. काही कलाकार असुरक्षित समजतात, अशी खंत गोखले यांनी बोलून दाखवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.