Pune : सदर्न कमांडच्या जवानांनी वाचविले साडेबारा हजार पूरग्रस्त नागरिकांचे प्राण

26 तात्पुरत्या पुलाची उभारणी आणि 50 रस्ते वाहतुकीसाठी केले खुले

एमपीसी न्यूज- केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. एनडीआरएफ, होमगार्ड, भारतीय लष्कराच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. पुण्यात मुख्यालय असणाऱ्या सदर्न कमांडच्या जवानांनी देखील केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावून पुरामध्ये अडकलेल्या सुमारे साडेबारा हजार पूरग्रस्त नागरिकांची सुटका केली.

केरळ राज्यामध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. आजपर्यंत तीनशेहून अधिक नागरिक या पुरामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. देशभरातून या नागरिकांच्या मदतीसाठी डॉक्टर्स, स्वयंसेवक, सामाजिक संस्था धावून आल्या आहेत. एनडीआरएफ, होमगार्ड, निमलष्कर आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पूरग्रस्त नागरिकांची मदत केली आहे.

पुण्यात मुख्यालय असणाऱ्या सदर्न कमांडच्या जवानांनी देखील केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. या जवानांनी केरळच्या विविध भागात जाऊन सुमारे साडेबाराहजार पूरग्रस्त नागरिकांची सुखरूप सुटका केली. त्यासाठी आवश्यक त्याठिकाणी 26 तात्पुरत्या पुलाची उभारणी केली. त्याचप्रमाणे 50 रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले.

20 ऑगस्ट रोजी सदर्न कमांडचे कमांडर ले. जन. डी आर सोनी यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून सदर्न कमांडच्या जवानांनी केलेल्या कामाची पाहणी केली. त्रिवेंद्रम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जुन्नरी केलेल्या कामाची प्रशंसा केली. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आमच्या जवानांनी त्या ठिकाणी जाऊन अनेक पुरग्रस्तांची सुटका केली. राज्य सरकारला जोपर्यंत आमच्या मदतीची गरज आहे तोपर्यंत आमची ही मोहीम चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध सामाजिक संस्थांनी मिळून केलेल्या कामाची देखील कमांडर सोनी यांनी कौतुक केले.

  

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.