Pune : स्पर्श आणि चवीने विशेष मुलांनी चाखला आंब्यांचा गोडवा

दृष्टीहिन व विशेष मुलांसाठी आंबे खाणे स्पर्धा

एमपीसी न्यूज – फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची चव चाखण्याचा आनंद समाजातील वंचित विशेष मुलांना हा आनंद मिळणे दुरापास्तच. अशा मुलांना आंबे खाण्याचा आनंद मिळावा, यासाठी पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. मँगो मेनियामध्ये पिवळ्याधम्मक हापूस आंब्यांची मेजवानी घेत स्पर्श आणि चवीने पुण्यातील 300 हून अधिक वंचित-विशेष मुलांनी आंब्याचा गोडवा चाखला.

उन्हाळ्याची सुरूवात झाली की वेध लागतात ते आंबे खाण्याचे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची चव चाखणे या महागाईच्या याकाळात सामान्यांना अवघड झाले आहे. समाजातील वंचित विशेष मुलांना हा आनंद मिळणे दुरापास्तच.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे दिव्यांग आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मेनिया या आंबे खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सीआयएएन हेल्थ केअरचे सुरज झंवर, अरिहंत जेनरिक ग्रुप वेलनेस इंडिया चे विपुल जैन, निरंजन सेवाभावी संस्थेचे धीरज भूत, स्वप्नील देवळे, जगदीश मुंदडा, डॉ. नवनीत मानधनी आदी उपस्थित होते. चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे यंदा ९ वे वर्ष होते.

आंबे खाणे स्पर्धेतील आंब्याच्या सुमारे 2 हजार 500 कोयी संस्थेचे कार्यकर्ते राजगड-वेल्हे आणि मुळशी परिसरात पेरणार असून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोकमंगल फाऊंडेशन, धर्मवीर संभाजीराजे अनाथ आश्रम, नूतन समर्थ विद्यालय, पुणे अंध शाळा, माहेर फाऊंडेशन आदी संस्थेतील ३०० हून अधिक विशेष मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.