Pune: महापालिकेच्या आवाहनाला अनेक संस्थांचा प्रतिसाद : आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेने मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक संस्था, सामाजिक संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार मदतीचे आवाहन केल्यामुळे अनेक संस्था, संघटना मदतीकरिता पुढे येत आहेत. पुणे मनपाच्या रुग्णालयात सध्या अद्ययावत वैद्यकीय साधन सामग्री व उपकरणे कोणती आवश्यक आहेत, याबाबत यादी करण्यात आली आहे.  या यादीनिहाय वस्तूस्वरूपात मदत मिळाल्यास योग्य होईल, असेही आयुक्त म्हणाले.

पुणे पांजरपोळ ट्रस्टच्या वतीने 43 लाख रुपये निधी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही या संस्थेचे आभार मानले. यावेळी सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभासद सुशील मेंगडे, उमंग पित्ती, वास्तुपाल रांका, सुहास बोरा, राजेश सांकला, भवरलालजी जैन, सुभाष राणावत, हेमंत संभूस, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शहराच्या दाट वस्तीच्या परिसरात हे प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील आणखी 22 ठिकाणे सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता त्यात वाढ करून तीन मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा. घरातच थांबावे, कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.