Pune : शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस या शाळेतील एका विद्यार्थ्यायाने चित्र काढली नाहीत म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. हा अर्धांगवायूचा झटका आहे. या प्रकरणाची शाळा प्रशासनाकडे पालकांनी तक्रार केल्यावर तात्काळ त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यास निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकाच्या मारहाणीत प्रसन्न पाटील याला दुखापत झाली.

एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्यांने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यानी प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर, पोटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा देखील झाला.

एवढा प्रकार घडून देखील शाळा प्रशासनाने माहिती प्रसन्नच्या घरी कळवली नाही. प्रसन्नला दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी घेऊन गेल्यावर पालकांना सविस्तर प्रकार समजला. त्यानंतर त्याला तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आज प्रसन्नच्या पालकांनी मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर संदीप गाडे याला तात्काळ निलंबित केले असून या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान, शाळेत असतानाच विद्यार्थ्याला त्रास होत होता. मात्र, शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोपही पालकांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.