Pune : सृजन करंडक 2019 फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज आणि विद्याभवन संघांचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

एमपीसी न्यूज – सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज आणि विद्याभवन संघांनी विजय मिळवून सृजन करंडक 2019 फटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. सेंट व्हिन्सेंट नाईट (रात्र) कॉलेजला विजयासाठी झगडावे लागले, तर विद्याभवनने सहज विजय मिळविला. या दोन्ही संघांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

“पीडीएफए’च्या ढोबरवाडी येथील मैदानावर शुक्रवारी झालेल्या सामन्यात सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेजने पिछाडीनंतर टायब्रेकरमध्ये पीईएस मॉडर्न कॉलेजचा 7-6 असा पराभव केला. नियोजित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. विद्याभवनने बाबूराव घोलप कॉलेजचा 3-0 असा पराभव केला.

पीईएस कॉलेजने 29व्या मिनिटाला ओमकार चिकणे याने केलेल्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राखली. उत्तरार्धात सामन्याच्या 38व्या मिनिटाला अरुण पिल्ले याने गोल करून सेंट व्हिन्सेंटला बरोबरी मिळवून दिली. सामना संपेपर्यंत ही बरोबरीची कोंडी फोडण्यात प्रतिस्पर्धी संघांना अपयश आले. त्यामुळे सामन्याचा निर्णय टायब्रेकरमध्ये घेण्यात आला.

टायब्रेकरच्या शूट-आऊटमध्ये सेंट व्हिन्सेंटकडून ऑस्टिन पायस, वैभव लोखंडे, मेहुल बाफना, निमेश बाफना, ऍरॉन डीसिल्वा, अरुण पिल्ले, तर पीईएसकडून अथर्व काटे, भद्रयाद गोडबोले, अभिनव सिंग, ओमकार चिकणे, कनिष्का कोल्हटकर यांनी गोल केले.

आजच्या दुसऱ्या सामन्यात विद्याभवन संघाने एकतर्फी वर्चस्व राखून सहज विजय मिळविला. अल्फ्रेड नेगल याने चौथ्याच मिनिटाला गोल केल्यावर ब्रेंडन स्टिफनने 13 आणि सौरभ कृष्णन याने 17व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात आपला वाटा उचलला.

निकाल -:
सेंट व्हिन्सेंट नाईट कॉलेज 1, 6 (अरुण पिल्ले 38वे मिनिट, ऑस्टिन पायस, वैभव लोखंडे, मेहुल बाफना, निमेश बाफना, ऍरॉन डिसूझा, अरुण पिल्ले) वि.वि. पीईएस मॉडर्न कॉलेज 1, 5 (ओमकार चिकणे 23वे मिनिट, अथर्व काटे, भग्रयाद गोडबोले, अभिनव सिंग, ओमकार चिकने, कनिष्का कोल्हटकर) मध्यंतर 0-1

विद्याभवन कॉलेज 3 (अल्फ्रेड नेगल 4थे मिनिटे, ब्रेंडन स्टिफन 13वे मिनिट, सौरभ कृष्णन 17वे मिनिट) वि.वि. बाबूराव घोलप कॉलेज 0. मध्यंतर 3-0.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like