Pune : स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी निवडणुकी दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, मावळते स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शिवसेना गटनेते संजय भोसले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून नगरसेवक सुनील कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका स्मिता कोंढरे यांना संधी देण्यात आली होती. तर स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने सुनील कांबळे यांचा विजय निश्चित मानला जात होता.

दरम्यान, आज निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी पक्ष आदेशानुसार अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे सुनील कांबळे यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सुनील कांबळे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आणि गुलाल उधळून एकच जल्लोष केला.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी आज सकाळी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल असे सांगितले. सुनील कांबळे यांच्या माध्यमातुन शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.

या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले, “स्थायी समिती अध्यक्ष दाच्या माध्यमातुन येत्या काळात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले जातील. तसेच शहराच्या विकासकामांना गती दिली जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.