Pune : पुण्यातील नियोजित ‘ट्रिपल आयटी केंद्र’ त्वरित सुरू करा -गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे येथे नियोजित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ (ट्रिपल आयटी) संस्था सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज लोकसभेत केली. ट्रिपल आयटी बिलाबाबत लोकसभेत चर्चा करण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ निर्माण व्हावे, विविध क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञाचा वापर व्हावा, यासाठी शिक्षणाचे मॉडेल तयार करणे, या उद्देशाने ट्रिपल आयटी संस्थची स्थापना करण्यात येणार आहे. ‘ट्रिपल आयटी’ ही संस्था पीपीपी या तत्त्वावर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा, राज्याचा ३५ टक्के आणि खासगी आयटी कंपन्यांचा १५ टक्के हिस्सा असणार आहे.

यावेळी गिरीश बापट म्हणाले, यापूर्वी देशामध्ये पंधरा ट्रिपल आयटी केंद्रांना मान्यता केंद्र सरकारने दिली होती. या पंधरापैकी पुणे हे एक केंद्र होते.या संस्थेसाठी राज्य सरकारने मावळ येथे जमीन दिली आहे. पुणे हे देशातील आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक नामांकित आयटी कंपन्या येथे सध्या कार्यरत आहेत.

अशा ठिकाणी ट्रिपल आयटी केंद्र सुरु झाले पाहिजे हा त्यापाठीमागील उद्देश होता. राज्यसरकारने जमीन देऊन सुद्धा आजही ट्रिपल आयटी संस्था पुण्यात सुरू झाली नाही.

याबाबत मी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. पण, सातत्याने पाठपुरावा करूनही याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती मिळत नाही. त्यामुळे याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करावी व लवकरात लवकर ही संस्था सुरु करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.