Pune : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टसाठी राज्य सरकारची परवानगी

State Government permission for Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Trust

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी ही संकल्पना मांडत विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यास महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

महापौर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या महाविद्यालयाची संकल्पना मांडून निधीही उपलब्ध करुन दिला होता. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसरात साकारणार असून त्यासाठी 10 एकर जागा राखीव करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मुख्यसभेत गेल्या वर्षी 28 ऑगस्टला मान्यता मिळाली होती. या संदर्भातील पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत महापौर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकासचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला होता.

याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला.

आणखी काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच 500 खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय करण्याचा मानस आहे. या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे पुणेकरांच्या वतीने मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो’.

595 पदांची निर्मिती आणि 622 कोटींची गरज 

‘महाविद्यालयात प्रत्यक्ष साकारताना विविध प्रवर्गातील 595 पदांची निर्मिती करुन भरती प्रक्रिया पार पडणार असून येत्या सहा वर्षात यासाठी टप्प्याटप्प्यात 622 कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे’, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.