Pune : राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत द्यावी :महापौर मुरलीधर मोहोळ

State government should provide financial assistance to Municipal Corporation: Mayor Murlidhar Mohol : - निधीसाठी महापौर आक्रमक,   साडेचार महिन्यांत महापालिकेचे 250 कोटी खर्च

एमपीसीन्यूज : ‘कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली.  कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही. परंतु, आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी’, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोरोना निर्मूलन आढाव्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू  बेड्स उभे करण्यात येणार आहेत.

कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.

यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यात राज्य शासन 50% पुणे महानगरपालिका 25 % पिंपरी चिंचवड महानगरपालिका 12.5% आणि पीएमआरडीए 12.5% असा हिस्सा उचलणार आहेत.

जम्बो आयसोलेशन सेंटरला राज्यशासन 50 % निधी देणार आहेत, यासाठी  राज्यशासनाचे धन्यवाद !.  गेली साडेचार महिने पुणे महानगरपालिकेने आत्तापर्यंत अडीचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च केले आहेत.

जम्बो आयसोलेशन सेंटरला अशा गरजेच्या वेळी पुणे महापालिका निधी देण्यास नकार देणार नाही. परंतु पुढील काळात राज्यशासनाने पुणे महापालिकेला आर्थिक रसद पुरवली आणि महापालिकेला बळ द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे, असेही मोहोळ म्हणाले.

‘शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील बेडस आणि अवाजवी शुल्क आकारणी याबाबत आजही नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी राज्य शासनाने ताबडतोब योग्य ती कारवाई करावी.

तसेच नागरिकांना काही खाजगी हॉस्पिटलमधून चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तरी यात राज्य शासनाने लक्ष घालून योग्य मार्ग काढावेत, अशा सूचना महापौर मोहोळ यांनी केलेल्या.

पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑगस्ट महिन्यातील मांडलेल्या अंदाजानुसार बेडची कमतरता दिसून येत आहे. 15 ऑगस्टपर्यंत जम्बो आयसोलेशन सेंटर सुरू होतील, परंतु तोपर्यंत बेडस च्याबाबतीत नव्याने यंत्रणा लागली पाहिजे.

तसेच रुग्णांना ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेडची कुठेही कमतरता पडू नये, यांची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, अशी सूचना महापौर मोहोळ यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.