Pune : अत्यावश्यक साधनसामुग्रीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्टिकर बंधनकारक ; जिल्हाधिकारी राम

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात बहुतांशी नागरिक लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असून, अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरु आहे.  याकाळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग (एक मीटर अंतर) ठेवावे. त्याचबरोबर अत्यावश्यक साधनसामुग्रीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्टिकर लावणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन रात्रंदिवस कार्यरत असून, या सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यास रस्त्यात अडवू नये. शेतकऱ्यांनी पीक काढणीची कामे योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत, अशा सूचना राम यांनी केल्या आहेत.

सद्यपरिस्थितीतही 5 ते 10 टक्के नागरिक कोणतेही कारण सांगून घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.