Pune : जिल्ह्यातील दारू विक्री तात्काळ बंद करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार आणि महिला अत्याचार थांबवायचे असतील तर जिल्ह्यातील दारू विक्री तात्काळ बंद करा, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गजानन बाबर व कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेड झोन असलेल्या पुण्यामध्ये दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण दारूच्या दुकानाबाहेर नागरिकांनी रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत. तसेच याठिकाणी ‘सोशल डिस्टन्ससिंग’चा फज्जा उडाला आहे. नागरिकांकडून कलम 144 चे सुद्धा उल्लंघन होत आहे.

हा प्रकार स्वत: हून कोरोनाला आमंत्रण देण्यासारखा आहे, तसेच जर रूग्ण संख्या वाढली तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ शकते. सरकारच्याच माहितीनुसार लाॅकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे असे असताना दारूच्या नशेत या गोष्टी पुन्हा वाढू शकतात. तसेच पोलीस यंत्रणेवरील ताण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल. तसेच कौटुंबिक हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढणार नाही व पोलिस प्रशासनाचा ताणही कमी होईल. त्यामुळे जिल्ह्यातील दारू विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी बाबर व पानसरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.