Pune : ‘पीएमपीएमएल’सह पुण्यातील एस.टी.बसेसच्या फेऱ्याही रद्द; विभागीय आयुक्त यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील ज्याप्रमाणे ‘पीएमपीएमएल’ बससेवा रद्द करण्यात आली त्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.)च्या पुणे विभागाकडूनही एस.टी.बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विभागीय आयुक्त यांनी आज प्रसिद्धी पत्रकात दिलेले महत्वपूर्ण मुद्दे पुढीलप्रमाणे :
1) राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) च्या पुणे विभागाच्या दि.22/03/2020 च्या सर्व फे-या रदद करणेत आलेल्या आहेत.

2) पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(पीएमपीएमएल) च्या दि.22/03/2020 च्या एकूण 21603 फे-यांपैकी 19110 फे-या रदद केल्या होत्या. 2493 फे-यांमध्ये एकूण 8727 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त अत्यावश्यक बाबींसाठी फे-या सुरु ठेवलेल्या आहेत.

3) देशाअंतर्गत विमानवाहतुकीबाबत – पुणे विमानतळ येथे दि.22/03/2020 रोजी 55 आगमनांव्दारे 2452 प्रवासी आले आहेत. या सर्वांना होम कोरंटाईन (Home Quarantine) च्या सूचना दिलेल्या आहेत. सदयस्थितीत आयसोलेशन (Isolation)ला कोणालाही पाठविलेले नाही.

4) कोरोना सांर्सगिक रुग्ण संख्येमध्ये 1 ने वाढ झाली असून आज दि.22/03/2020 अखेर एकूण रुग्ण संख्या 28 आहे. सदर रुग्णास नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

5) कोरोना रुग्णाच्या सर्वेक्षणातंर्गत आज दि.22/03/2020 अखेर भेट दिलेल्या एकूण घरांची संख्या 229180 इतकी आहे. भेट दिलेल्या घरांतील व्यक्तींची संख्या 980273 इतकी असून संदर्भीत केलेल्या व्यक्तीची संख्या 132 एवढी आहे.

6) जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे यांनी तसेच पोलीस खात्याने पुणे जिल्ह्यामधील कोरोना विषाणू संसर्ग व संक्रमण रोखण्यासाठी दि. 22 मार्च 2020 रोजी पुढे नमूद केलेले 4 आदेश निर्गमीत केलेले आहेत.

अ) जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे यांनी फ़ौजदारी दंड प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात जमावबंदी आदेश लागू केला असून त्याअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास दि. 23.3.2020 ते 31.3.2020 या कालावधीमध्ये मनाई करण्यात आलेली आहे.

ब) पोलीस सह आयुक्त, पुणे यांनी फ़ौजदारी दंड प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये जमावबंदी आदेश लागू केला असून त्याअंतर्गत खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास दि. 23.3.2020 ते 31.3.2020 या कालावधीमध्ये मनाई करण्यात आलेली आहे.

क) पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी फ़ौजदारी दंड प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 (3) अन्वये पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये जमावबंदी आदेश लागू केला असून त्याअंतर्गत खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास दि. 23.3.2020 ते 31.3.2020 या कालावधीमध्ये मनाई करण्यात आलेली आहे.

ड) जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणा-या कंपन्यांना त्यांचे आस्थापनेवरील कर्मचा-यांना (कंपनीमधील अत्यावश्यक सेवा वगळता) घरून काम करण्याच्या (Work from Home) सुचनांची अंमलबजावणी करण्याकरीता आदेश निर्गमीत केलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.