Pune : फटाका स्टॉल संदर्भात पुणे महापालिकेचे धोरण जाहीर

एमपीसी न्यूज- शहरातील विविध भागात दिवाळीसाठी लावण्यात येणार्‍या फटाका स्टॉलला महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून परवाने दिले जातात. हे परवाने देताना काही नियमावलीचे पालन करण्याचे बंधन घातले जाते. मात्र, ऐनवेळी फटाका स्टॉल धारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे यंदा महापालिकेकडून फटाका स्टॉल संदर्भात नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यंदा फटाका स्टॉलला परवाने देण्याची प्रक्रीया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

यासंदर्भात गुरुवारी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्या कार्यालयात मालमत्ता व्यवस्थापन, अतिक्रमण, आकाशचिन्ह व परवाना आणि अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत फटाका परवान्यासाठी तयार केलेल्या धोरणावर चर्चा करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, फटाका स्टॉलसंदर्भात पालिकेने एक धोरण तयार केले आहे. धोरण तयार करताना औरंगाबाद येथील फटाका स्टॉलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेसंबंधीच्या सर्व शक्यतांचा आणि उपाय योजनांचा विचार करण्यात आला आहे.

स्टॉलचे परवाने देताना धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभाग आराखडा तयार करत आहे. दोन दुकानांमध्ये किमान तीन मीटरचे अंतर आसावे, दोन दुकानांच्या मधील मोकळ्या जागेत कोणत्याही वस्तू ठेवू नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवासी क्षेत्र, दुकानांच्या समोर आणि रस्त्यांच्या कडेला स्टॉल उभारण्यास परवानगी मिळणार नाही, फटाका स्टॉल मोकळ्या जागेतच असतील, आदी बाबींचा समावेश नवीन धोरणात आहे. धोरणातील सर्व नियमांचे पालन होते आहे किंवा नाही, याचीही शहानिशा करण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती केली जाणार आहे. परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना राबविली जाणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.