Pune : क्वारंटाईनचे उल्लंघन करणा-यांवर होणार कठोर कारवाई -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – प्रशासनाने ज्या व्यक्तींना क्वारंटाईन (विलगीकरण) केले आहे, अशा नागरिकांनी जर उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन केले जाईल. एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोक्यात टाकणार नाही, अशी सक्त ताकीद विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्यात काही नागरिकांना घरातच क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत त्यांच्याकडून फॉर्म देखील भरून घेण्यात आले आहेत. या नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या असताना देखील त्या व्यक्ती समाजात वावरताना दिसतात. असे प्रकार समोर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच या व्यक्ती समाजात फिरल्यास त्याचा कुटुंब आणि समाजाला धोका आहे. त्यामुळे एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोक्यात टाकणार नसल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले –
#एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोक्यात घालणार नाही. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करणार

#आज, मंगळवार (दि. 17) पासून सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार. पाणीपुरवठा, आरोग्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्य अत्यावश्यक सेवेत तसेच ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी कार्यरत असलेली कार्यालये सुरु राहणार

#परिवहन कार्यालयातील परवाने वाटप आजपासून बंद. ऑनलाईन नूतनीकरण सारखी कामे करता येतील.

#पीएमपीएमएलची प्रवासी संख्या 12 लाखाहून 9 लाखावर आली.

#प्रवासी संख्या अत्यंत कमी असलेल्या मार्गावरील बस फे-या 50 टक्क्यावर आणणार. पीक अवर्स मध्ये बस फे-या कमी नाहीत. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

# मागील दोन दिवसात पुण्यातून 11 हजार प्रवासी पुण्याबाहेर गेले. तर 8 हजार प्रवासी पुण्यात आले.

# आवश्यकता भासल्यास जिल्ह्यातील 2 हजार 800 होमगार्ड देखील तैनात करणार.

# आज, मंगळवार (दि. 17) पासून 31 मार्चपर्यंत आधारकार्ड मिळणार नाही.

# मागील 24 तासात 32 जणांना डिस्चार्ज दिला आहे. एक नवीन रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 17 झाली आहे.

# मागील 24 तासात प्रशासनाने 7 हजार घरांना भेटी देऊन 21 हजार 583 नागरिकांची माहिती घेतली आहे. त्यातील 5 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.

# मागील 24 तासात पुणे विमानतळावर 148 प्रवासी दाखल झाले. सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रवाशांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नसली तरीही त्यांना घरातच क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.