Pune : शहरात लॉकडाऊनचे काटेकोर पालन; रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आता महिनाभराचा कालावधी झाला आहे. गेल्या खाई दिवसांमध्ये काही पुणेकरांकडून लॉकडाऊनकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात झाल्याने पुण्यातील रस्त्यांवर सध्या स्मशान शांतता पाहायला मिळत आहे.

पुणे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर पोलीस सोडले तर कोणीही दिसून येत नाही. सर्व दुकाने बंद आहेत. पुणे हे कोरोनामुळे अतिशय हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे शहरात आणखी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्या. त्यानंतर पुणे पोलिसांकडून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडुके पडू लागल्याने त्यांना आता लॉकडाऊनचे महत्व कळायला लागले आहे. त्यामुळे घराबाहेर पडायचे धाडस कुणी दाखवत नाही. त्यामुळेच शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 800च्या वर गेली आहे. तर, 53 च्या आसपास नागरिकांचा बळी गेला आहे. हे संकट कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. त्यामुळे 3 मे रोजी तरी पुण्याची सुटका होणार की नाही, याचा काहीही भरवसा नाही.

पुण्यातील 42 टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्या ठिकाणी अतिशय दाटीवाटीने नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांना आता कोंढवाड्यासारखे जीवन नकोसे झाले आहे. त्यापेक्षा आपला गाव बरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर, दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतेच आहेत.

भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, नाना पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, नारायण पेठ, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, येरवडा – कळस – धानोरी, वारजे – कर्वेनगर भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत.

मागील 30 दिवस लोकडाऊनचे अतिशय कठीण झाले आहे. या कालावधीत घरात होते नव्हते ते आता संपले आहे. दानशूर मंडळींनीही आता हात आखडता घेतला आहे. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.