Pune : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा : डॉ. दीपक म्हैसेकर

विभागीय आयुक्तांचा जिल्हाधिका-यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच ग्रामीण तसेच नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टिसींग ठेवत आवश्यकता आहे. त्या ठिकाणी नरेगा अंतर्गत कामे तात्काळ सुरू करा. तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगत प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील पोलीस आयुक्त , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधत कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये कायदा व सुव्यवस्था, जिल्हा व महानगरपालिका स्तरावर कोरोनाबाबतच्या वैद्यकीय सुविधा, खाजगी हॉस्पीटलचा सहभाग व उपलब्धता, उपलब्ध क्वारंटाईन व आयसोलेशन सुविधा, अडकून पडलेले मजूर, प्रवाशी यांची व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा स्थिती, शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींसाठी करण्यात आलेली व्यवस्था, भाजीपाला व दूध पुरवठा स्थिती, उद्योग, कारखाने स्थिती, स्वंयसेवी संस्थांचा सहभाग व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे अनुभव तसेच राजस्थानातील कोटा येथून परतणा-या विद्यार्थ्यांची सोय यासोबतच महत्वाचे प्रश्न व कोवीडमुळे होणारे मृत्यू आदी विषयांचा जिल्हा व सबंधित यंत्रणेकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी आवश्यक त्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी कोरोना संदर्भात कार्यरत असलेले विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.