Pune : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करा; केंद्रीय पथकाची बारामती प्रशासनाला सूचना

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा 

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा. तसेच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी, संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर द्या . प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या. बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केन्द्रीय स्तरावरील पथक बारामती तालुक्यामध्ये आज, (गुरुवारी) दाखल झाले. या केंद्रीय पथकाने बारामती शहरातील देसाई इस्टेट सिल्व्हर  ज्युबिली रूग्णालयाला भेट देवून पाहणी केली. तसेच कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

 

शासकीय विश्रामगृहात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे,  नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर उपस्थित होते.मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर आदि उपस्थित होते.

डॉ. गडपाले म्हणाले, बारामती तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत. बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह असलेल्या ठिकाणी अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच पाहणी दरम्यान केंद्रीय पथकाला देसाई इस्टेट येथील खुशालचंद छाजेड सभागृहात वॉर्डमध्ये कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. कोरोना विषाणूबाबत उपस्थित स्वययंसेवकांच्या शंकाचे निरसन करून त्यांना डॉ. ए. के. गडपाले यांनी मार्गदर्शन केले.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुका प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तालुक्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. विविध पथके स्थापन करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.