Pune : रॅलीमधून फलकांद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

एमपीसी न्यूज : पर्यावरण वाचवा… झाडे लावा, झाडे जगवा… प्लास्टिकचा वापर टाळा… गो ग्रीन… स्वच्छता ही प्रगती है… पानी अनमोल है उसे बचाके रखिए… इंधन वाचवा… जल है तो कल है… स्टॉप ग्लोबल वॉर्मिंग… अशा विविध संदेश फलकांद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती केली. पर्यावरणविषयक फलकांद्वारे रॅलीच्या माध्यमातून 5000 विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

यावेळी स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सेठ, सोसायटी आॅफ जिजस ख्राईस्ट चे प्रोविनशीअल रेव्ह फादर अँर्ड्यू फर्नांडिस, सेंट व्हिन्सेंट चे प्राचार्य फ्रान्सिस पटेकर, रेव्ह फादर केनी मस्किटा, स्वच्छंद पुणेचे प्रा. रवींद्र शाळू, पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे, शिक्षण अधिकारी डॉ. गणपत मोरे, अ‍ॅड. एस. के. जैन, बिशप्स हाऊसचे व्हिकार जनरल फादर माल्कम सिक्वेरा, आॅर्नेलाज हायस्कूलचे प्राचार्य फादर प्रवीण पवार,फादर राजेश बनसोडे, फादर आनंद गायकवाड उपस्थित होते

दि पूना डायॉसिसन एज्युकेशनल सोसायटीच्या पूना डायॉसिसन बोर्ड आॅफ एज्युकेशनतर्फे वार्षिक पर्यावरण महोत्सवांतर्गत नाना पेठेतील आॅर्नेलाज हायस्कूल ते सेंट व्हिन्सेंट हायस्कूल दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीचे संपूर्ण नियोजन पूना डायॉसिसन एज्युकेशन संस्थेचे सचिव फादर सायमन डिसुझा यांनी केले होते.

या रॅलीमध्ये ३३ इंग्रजी व मराठी माध्यमातील शाळांधील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्व सांगणारे व पर्यावरण रक्षणविषयक विविध संदेश फलकांद्वारे जनजागृती केली. तसेच यावेळी पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. रॅलीची सांगता सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झाली. यावेळी पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांनी नृत्ये, गीते व नाटिकांचे सादरीकरण केले.

बिशप डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, “पर्यावरणाचे आपण सर्वांनी रक्षण केले पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. निसर्गातील सर्व गोष्टी म्हणजे देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. पर्यावरण, निसर्ग, भूमाता, विश्व ही सगळी आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे. आपण निसर्गाचे मालक नाही. परमेश्वर निसर्गाचा मालक आहे. त्याने सुंदर विश्व निर्माण केल्याबद्दल आपण त्याचे आभार मानुया”

अ‍ॅड. एस. के. जैन म्हणाले, “आपल्याला मिळणारी वीज ही देखील निसर्गापासूनच निर्माण होते. त्यामुळे त्याचा कमीतकमी वापर करा. वीजेचा आवश्यक तेवढा वापर केल्यास इंधनाची बचत होईल.डॉ. गणपत मोरे म्हणाले, आपण अवकाशाला गवसणाी घातली आहे, पण प्रदुषणाची समस्या खूप मोठी आहे.
पर्यावरणाचे रक्षण न केल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. तसेच अस्वच्छता कशी होणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे” फादर जेम्स लुक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.