Pune : विद्यार्थ्यांनी साकारला अहिंसेचा मानवी चरखा; 500 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे पंधरावे वर्ष आहे. सप्ताहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तब्बल 500 शालेय विद्यार्थ्यांनी अहिंसेचा मानवी चरखा साकारला आहे.

अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटरसमोरील नूतन मराठी विद्यालय (नू.म.वि.प्राथमिक शाळा) येथे झालेल्या कार्यक्रमाला सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, नाना बिडवे, गणेश नलावडे, रोहन सुरवसे, चंद्रशेखर कपोते, चित्रा माळवे, प्रशांत वेलणकर, सलिल शेख, नू.म.वि. प्राथमिक शाळेच्या आशा नागमोडे, सुनीता गजरमल आदी उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीद दाभोळकर यांनी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शुभेच्छा संदेशात व्हिडिओ द्वारे हमीद दाभोलकर यांनी सांगितले. महात्मा गांधींचा वारसा जाणीवपूर्वक नष्ट केला जात असल्याचा प्रयत्न सध्या होत आहे. गांधींचा वारसा जपण्याचा आणि जागविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. स्वच्छतेच्या संदेशापुरते गांधीजींना मर्यादित केले जात आहे. गांधीजींविषयी बदनामीकारक गोष्टी पसरविल्या जातात. मात्र, ते चुकीचे असून गांधीजींचे विचार आपण अंमलात आणायला हवेत.

यावेळी मोहन जोशी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढयात मोठे योगदान देणा-या महात्मा गांधींचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आज देशात हिंसाचार व हुकुमशाही वाढत आहे. त्यावेळी अहिंसेने सर्व प्रश्न सोडविण्याकरीता प्रत्येकाने पुढे यायला हवे. गांधीजींनी दिलेला सर्वधर्म समभाव व एकतेचा संदेश आजच्या पिढीमध्ये पोहोचावा. हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

स्वातंत्र्यसेनानी ग्रुपच्या वतीने पथनाटय सादर करण्यात आले. यामध्ये गांधी-आंबेडकरांच्या पुण्यातील करार, जालियनवाला बाग हत्याकांड, सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, आगाखान पॅलेसमधील घटना आणि महात्मा गांधीजींची हत्या असे अनेक प्रसंग दाखविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.