Pune : विद्यार्थ्यांनी मिळेल ती रोजगाराची संधी स्वीकारावी – विश्वेश कुलकर्णी

एमपीसी न्यूज – कोरोना संकटामुळे उद्योगजगताला भेडसावणारी समस्या समजून घेऊन नोकरी शोधताना अवास्तव अपेक्षा दूर ठेवून मिळेल ती रोजगाराची संधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, असे मत नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटचे(एनआयपीएम)चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स तर्फे ‘कोविड नंतरच्या उद्योगक्षेत्राच्या परिस्थितीबाबत विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करणे’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. कुलकर्णी म्हणाले, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकाऱ्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपापले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे.

भलेही विद्यार्थ्यांना सध्या मोठे पॅकेज असलेल्या, जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळणार नाहीत, मात्र प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी संकुचित मानसिकता बाजूला ठेवून प्रसंगी कमी पगाराची उपलब्ध असेलेली रोजगार संधी स्वीकारावी.

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ज्या प्रमाणात नोकऱ्यांचे पगार होते तितके पगार देणे सध्या कोणत्याच उद्योगक्षेत्राला परवडणारे नाही. अशा परिस्थितीत पालक आणि प्लेसमेंट अधिकाऱ्यांनी वास्तवाचे भान बाळगत सारासार विचार करून उद्योगक्षेत्रात काम करण्याची किमान संधी तरी उपलब्ध होत आहे, यावर समाधानी राहून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची मानसिकता कशी सकारात्मक होईल याचा प्रयत्न करावा.

विशेषतः यासाठी प्लेसमेंट अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जवळपासच्या कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांशी संपर्क साधून नेमक्या कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी सध्या उपलब्ध आहेत. कोणत्या प्रकारच्या संधी नजीकच्या भविष्यात तयार होऊ शकतात याचा अंदाज घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

चीनमधून भारतात येऊ घातलेल्या कंपन्याचे प्रमाण लक्षात घेता नजीकच्या भविष्यात आणखी रोजगारसंधी निश्चितच उपलब्ध होतील. मात्र, तोपर्यंत का होईना प्रत्येकाने उद्योगक्षेत्रात सक्रिय राहणे गरजेचे आहे. प्रसंगी विनामोबदला काम करण्याची संधी मिळाली तरीही ती स्वीकारावी जेणेकरून प्रत्यक्ष कामाचा अनुभव गाठीशी राखता येईल, असे कुलकर्णी म्हणाले.

तसेच सध्या घरी असलेल्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन इंटरव्हयुबाबतचे कौशल्य शिकून घेतल्यास त्याचा नक्कीच लाभ होईल असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सच्या पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष डॉ. शीतल कुमार रौन्दाळे यांनी या वेबिनारचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

राज्यातील विविध अभियांत्रिकी, औषधनिर्माण व व्यवस्थापन महाविद्यालयांचे प्लेसमेंट अधिकारी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.