Pune : स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांनी झोकुन देऊन अभ्यास करावा- उज्ज्वलकुमार चव्हाण

एमपीसी न्यूज- स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांनी झोकुन देऊन प्रामाणिकपणे अभ्यास करावा असे आवाहन आयकर विभागाचे उपायुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘पी ए इनामदार इन्स्टिट्युट फॉर अॅडमिनीस्ट्रेटीव सर्व्हीसेस’ हे स्पर्धा-परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी चव्हाण बोलत होते.

यावेळी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झालेले मच्छिंद्र गळवे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा पध्दती ही देशाचा गाडा चालविण्यासाठी सक्षम युवक-युवती शोधणारी सर्वोत्तम पध्दती असून यशापयशापेक्षा व्यक्तीमत्व विकसनाची सुवर्णसंधी आहे” असे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

मच्छिंद्र गळवे म्हणाले, ” केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक, आरआरबी, महा ऑनलाईन अशा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी आपण इंग्रजी माध्यमातून, शहरात शिकलो पाहिजे असे नाही. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 90 टक्के आहे. स्पर्धा परीक्षा वाटतात तितका अवघड नाहीत, अभ्यासासोबत इतर उपक्रमात, स्पर्धात सहभागी व्हा आणि व्यक्तिमत्व विकसित करा. आपल्याला समजलेला अभ्यास सहकाऱ्यांना समजावून सांगीतल्याने अधिक फायदा होतो”असा सल्ला मच्छिंद्र गळवे यांनी यावेळी बोलताना दिला.

डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, ” 100 विद्यार्थ्यांना दीड वर्षाचे निवासी सुविधांसह ना नफा -ना तोटा तत्वावर प्रशिक्षण दिले जाईल. गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. गरीबी आणि मागासलेपण हा गुन्हा नाही, तर त्याविरुद्ध संघर्ष न करणे हा गुन्हा आहे. स्वतःच्या क्षमता न वापरणे, हा गुन्हा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा”

या सेंटरचे कार्यकारी संचालक प्रशांत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रशीद शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या केंद्रामध्ये कमी फी मध्ये उत्कृष्ट पध्दतीचे अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन PAI-IAS अॅकॅडमी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नावनोंदणी करून प्रवेश परीक्षेमार्फत अॅडमिशन घ्यावे, असे आवाहन PAI-IAS संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत चव्हाण यांनी केले आहे. तसेच www.paiias.in या वेबसाईटवरही ऑनलाईन फॉर्म उपलब्ध असतील अशी माहिती त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.