Pune : पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग करणारे टनेल बोरिंग मशीन जेएनपीटी बंदरात दाखल; डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष भुयारी कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा मार्ग भूमिगत असणार आहे. हा मार्ग बनविण्यासाठी टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहे. या कामासाठी लागणारी पहिली टनेल बोरिंग मशीन मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात दाखल झाले आहे. चीनमधील टेराटेक कंपनीच्या कारखान्यातून ही मशीन मागवण्यात आली आहे. लवकरच ती मशीन पुण्यात दाखल होणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

पुणे मेट्रोच्या तांत्रिक सल्लागार अधिकाऱ्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये टेराटेक कंपनीच्या कारखान्यात या मशीनची चाचणी केली आहे. त्यानंतर जहाजाद्वारे ही मशीन मुंबई बंदरात आणण्यात आली आहे. जेएनपीटी ते पुणे ही मशीन रोडमार्गे लवकरच पुण्यात दाखल होणार आहे. कृषी महाविद्यालयाजवळ भूमिगत मार्गाचे प्राथमिक पूर्ण झाले आहे. लगेच पुढील कामासाठी सुरुवात होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पात कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा पाच किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई, स्वारगेट ही पाच स्थानके आहेत.

अत्यंत दाट लोकवस्तीत व व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना या भुयारी मेट्रो मार्गाद्वारे जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये नागरिक व व्यापा-यांना दळणवळणाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. भुयारी मार्गाचे काम अत्यंत किचकट, खर्चिक व जोखमीचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे काम करणे सोयीस्कर झाले आहे. पुणे मेट्रोचे पाच किलोमीटरच्या भुयारी मार्गासाठी चार टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन टनेल बोरिंग मशीनची निविदा (वर्क ऑर्डर) टेराटेक ह्या हाँगकाँग येथील कंपनीला देण्यात आली आहे.

टनेल बोरिंग मशीन जमिनीखाली उतरवण्यासाठी लागणारा खड्डा पूर्ण झाला आहे. कृषी महाविद्यालय व स्वारगेट येथील खड्ड्यात मशीन उतरवून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. या मशीनचा व्यास 6.65 मीटर असून लांबी 120 मीटर आहे. टनेल बोरिंग मशीनने तुकडे केलेले दगड कन्वेयर बेल्टद्वारे भुयाराच्या बाहेर आणले जातात. हे दगड रस्ते, सिमेंट काँक्रीटसाठी वापरले जातात. भुयारी कामात पाण्याचा स्रोत लागल्यास त्याचा कामावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी मशीनद्वारे घेतली जाते. भुयाराचे काम ज्या गतीने पुढे जाईल, त्या गतीने भुयारात सिमेंट काँक्रीट देखील होणार आहे. जाण्या-येण्याच्या दोन्ही मार्गांसाठी दोन स्वतंत्र भुयारे बनविण्यात येत आहेत.

ही मशीन 24 तासांमध्ये सहा ते सात मीटर भुयार तयार करते. भुयारी मार्गाचे काम करताना जमिनीवरील घरे व इमारती यांचे सर्वेक्षण केले जाते. भुयाराच्या दोन्ही बाजूला 50 मीटर अंतरावरील घरांच्या भिंतींचे फोटो व व्हिडिओ काढून घरमालकांना देण्यात येतात. या भूयारी मशीनच्या कामामुळे कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी प्रत्येक पातळीवर घेतली जाणार आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “महामेट्रो भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरु करत असून उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाद्वारे भूमिगत मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठीची टनेल बोरिंग मशीन अत्याधुनिक असल्यामुळे भूपृष्ठावरील घरांना कोणत्याही प्रकारची इजा पोहचणार नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.