Pune : माजी उपमहापौर धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश ; शासनाकडून घरभाडे वसुली पुढे ढकलण्याचा आदेश

एमपीसी न्यूज – पुणे शहरात राहणारे सर्वसामान्य नागरिक शहराच्या विकासात मोलाच सहकार्य करतात. पण, शहरामध्ये त्यांचं हक्काच घर नाही. ते भाड्याने राहतात. त्यांना कोरोनामधील लाॅकडाउनचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांचे घरभाडे घर मालकांनी शिथिल करावे, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दि. 5 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची राज्य शासनाने दाखल घेतली आहे.

शासनाने घरभाडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल माजी महापौर धेंडे यांनी राज्य शासनाचे आभार मानले. हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी महापौर, आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. तसेच मुळ मालकांनी जबरदस्ती करू नये, तसे केल्यास शासनाकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन पुणे शहरातील भाडेकरूंना धेंडे यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे हातावरच पोट असणारे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. लोकडाऊनच्या काळात या नागरिकांचे होते नव्हते ते आता संपले आहे. पुणे शहरात 42 टक्के नागरिक हे झोपडपट्ट्यात राहतात. या झोपडपट्टीचे 50 टक्के नागरिक मूळ झोपडपट्टीधारकाकडे भाडे देऊन राहतात. शहराची साफसफाई करणारे, बांधकाम मजूर, रिक्शा, टॅक्सी चालक, माथाडी कामगार, विविध खाजगी कार्यालयातील कामगार, घरकाम करणाऱ्या महिला भाड्याने राहतात.

त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या नागरिकांच्या बँक खात्यात शासनाने प्रत्येकी 10 हजार रुपये जमा करावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.