Pune : बागूल मित्र परिवाराचे सहकारनगर ते कात्रज परिसरात मदतकार्य

एमपीसी न्यूज – सहकारनगर ते कात्रज परिसरात पुणे नवरात्रौमहोत्सव समिती आणि आबा बागुल मित्र परिवार यांच्या वतीने गरजू, ज्येष्ठ नागरिक यांना जीवनावश्यक वस्तू, औषधे यांचा पुरवठा चालू आहे.

सहकार नगर भागातील ३५ ज्येष्ठ नागरिकांना या मदतकार्यात सकाळी, संध्याकाळी सेवा पुरवण्यात आली. हाताशी कोणतेच काम नसलेले बिहार, उत्तर प्रदेशातील मजूर, वस्ती पातळीवरील गरजू अशा सुमारे दोन हजार कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा शिधा आणि स्वच्छतेसाठी साबणाच्या दोन-दोन वड्या बागुल मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी लोकांचे सतत फोन येत असतात असे अमित बागुल यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांकडून औषधांसाठी मदत मागितली जाते. अशावेळी त्यांच्या घरी जायचे, प्रिस्क्रिप्शन घ्यायचे, मेडिकल दुकानातून ते औषध घ्यावयाचे आणि संबंधित व्यक्तीच्या घरी ते पोहोचवायचे. अशा प्रकारचे काम करावे लागते. सहकारनगर भागात एकेकटे रहाणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. या मदतकार्यामुळे त्यांची सोय झाली आहे, असे बागुल यांनी सांगितले.

तळजाई भागात डोंगरावर रहाणाऱ्या दास घुगे या मुलाला मेंदूचा विकार असल्याने त्याला तातडीने औषधाची गरज होती. दास अंध असून त्याचे वृद्ध आई-वडील असहाय्य आहेत. वडील हातगाडीवर केळी विकतात, आई घरीच असते. गेले १५ दिवस केळी विक्रीचा धंदा बंद असल्याने या कुटुंबाकडे पैसेच नव्हते. त्यांची गरज कळताच आम्ही गेलो आणि दासची औषधे तसेच त्यांना घरात लागणारे किराणा सामान दिले. त्या मुलाच्या अवस्थेविषयी ऐकल्यावर औषधे विक्रेत्याने दहा टक्के सवलतीत औषधे दिली असे अमित बागुल यांनी सांगितले.

या सेवा काळात पोलीसांना मास्क आणि सॅनिटायझर पुरविण्यात आले. पोलीसांच्या चहापाण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीलाही कार्यकर्ते जातात. या पद्धतीने काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पोलीस खात्याकडून विशेष पास द्यायला हवेत. पोलीस खात्याने पूर्ण माहिती घेऊन पास द्यावेत पण, ती पद्धत सुटसुटीत हवी, अशी मागणी बागुल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.