Pune : सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा ‘Selfie With Potholes’ मोहीम

एमपीसी न्यूज- एक वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे त्यांनी राज्यातील रस्त्यांची दुरवस्था सरकारला दाखवण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरू केली होती.मात्र, एका वर्षांनंतरही राज्यातील रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’च असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात ‘सेल्फी विथ पॉटहोल्स’ ही मोहीम उघडली आहे. एक वर्षांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाट येथून खड्ड्याबरोबर सेल्फी घेऊन सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष झालं तरी देखील तेथील खड्डा बुजवला गेला नसल्याचं दाखवत पुन्हा एकदा आज बोपदेव घाटात त्याच ठिकाणाहून ‘सेल्फी’ काढत सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे.

वर्षापूर्वी Selfie With Potholes ही मोहीम सुरु करताना बोपदेव घाट येथे मी सेल्फी काढून रस्त्याची दुरवस्था दाखवून दिली होती. आज एक वर्षानंतर देखील या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी रोज नवी डेडलाईन मिळते पण काम काही होत नाही. असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

रस्ते राज्याच्या विकासाच्या जीवनवाहिन्या असतात. त्या खड्ड्यांमुळे कोंडल्या गेल्या आहेत. याचा जनतेला त्रास सहन करावा लागतोय. शिवाय खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण मिळते. मुख्यमंत्र्यांनी खड्डे बुजवून रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला हे सांगावे असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही ! वाढते अपघात त्यामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण ? पारदर्शक कारभाराचे दावे करणाऱ्या या सरकारला रस्त्यांची दुरवस्था दाखवुया. अस आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.