Pune : सुप्रिया सुळे एक लाख मताधिक्याने पराभूत होतील- खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज- देशभरात होणार्‍या लोकसभा निवडणूकीमध्ये मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा निवडून येतील. तसेच यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील. असा विश्वास महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला. तर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मताधिक्याने पराभव होईल. असा दावा देखील त्यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधताना राज्यातील निवडणुकीबाबत भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी संजय काकडे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. बारामती वगळता खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदार संघातून भाजपला आघाडी मिळेल. यामुळे किमान एक लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित होईल. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

काकडे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली. ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेतही मी प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत- संजय काकडे

पुण्यासह बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. तसेच गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत. प्रत्येक निवडणुकीत अनेक इच्छुक असतात. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचे काम करायचे असते आणि हा प्रोटोकॉल असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.