Pune News : सूर सरिता संगीत महोत्सवात रसिकांना सुरेल गायन अन्‌‍ बहारदार वादनाची अनुभूती

एमपीसी न्यूज  : ज्येष्ठ सितारवादक कै. सरिता मित्रगोत्री (Pune News) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित सूर सरिता संगीत महोत्सवात रसिकांना सुरेल गायन आणि बहारदार वादनाची अनुभूती आली.

संपदा भालेराव व डॉ. समीर मित्रगोत्री परिवारातर्फे एस. एम. जोशी सभागृहात सूर सरिता संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीची सुरुवात ज्येष्ठ गायक, संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या शिष्या युवा गायिका राधिका ताम्हनकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग पुरिया धनश्रीने सादरीकरणास सुरुवात करून ‘बल बल जाऊ’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत लयीतील ‘मुश्किल करो आसान’ आणि द्रुत एक तालातील ‘देखी तोरी आन-बान’ या बंदिशींचे प्रभावीपणे सादरीकरण केले. पंडित पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेली ‘राम नाम रस पिये’ ही मिराबाईंची रचना रसिकांची वाहवा मिळवून गेली.

मैफलीच्या पुढील भागात कै. सरिता मित्रगोत्री यांच्या कन्या संपदा भालेराव यांनी चारुकेशी रागाने सतार वादनास सुरुवात केली. भालेराव यांच्या बहारदार वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. (Pune News) पिलू रागातील एक धून सादर करून भालेराव यांनी रसिकांना मोहित केले. आपल्या भावना व्यक्त करताना संपदा भालेराव म्हणाल्या, आईच्या वाढदिवसानिमित्त पंडित हेमंत पेंडसे यांच्या सहकार्याने दरवर्षी सूर सरिता महोत्सवाचे आयोजन केले जाते. गुरू म्हणून आईची पंडित पेंडसे यांच्यावर नितांत श्रद्धा-भक्ती होती. सरांकडूनही मित्रगोत्री परिवाराला सदैव स्नेह मिळत आहे.

Chinchwad Bye Election : चिंचवडमध्ये 50 हजार मतदार वाढले, 5 लाख 66 हजार मतदार ठरविणार आमदार

सूर सरिता संगीत महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायक, संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या गायानेन झाली. पंडित पेंडसे यांनी सुरुवातीस राग अभोगी सादर करून नंतर पंडित सी. आर. व्यास यांची ‘मन मोरा चाहत नित आयो’ ही बंदिश ऐकवून रसिकांचे कान तृप्त केले. भैरवी आणि बहादुरी तोडी (Pune News) रागांचे मिश्रण असलेले स्वामी स्वरुपानंद रचित ‘कृपावंत थोर सद्गुरू उदार’ हे भजन सादर करून भक्तीरसाची प्रचिती दिली. मैफलीची सांगता हेमंत पेंडसे यांनी आपले गुरू पंडित अभिषेकीबुवा यांच्या ‘परब्रह्म भेटी लागे’ या रचनेने करताना गुरुंप्रति आदरभाव व्यक्त केला.

सुरेश फडतरे, हनुमंत फडतरे, विनायक गुरव, उमेश पुरोहित, अभिजित बारटक्के, प्राची नारकर, तेजस मेस्त्री, यश कोल्हापुरे, सोपान म्हस्के यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सत्कार निखिल केंजळे, अनिल पटवर्धन यांनी केला. सूत्रसंचालन सायली जोशी यांनी केले तर आभार प्राची नारकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.